लातूर जिल्ह्यातील वाढत्या कोवीड१९ प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण तपासणीत येणाऱ्या आडचणी आणि लागणारा वेळ लक्षात घेता, संशयितांचे व कंटेनमेंट झोनमधील स्वॅब घेण्यासाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित केली असून या माध्यमातून आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत.
अलीकडच्या काळात शहराप्रमाणे ग्रामीण भागातही कोवीड१९ चे रुग्ण सापडू लागले आहेत, त्यामुळे कोवीड१९ पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयाच्या ठिकाणी घेऊन जावे लागत होते, यातून संशयित व्यक्तींच्या वाहतुकीसह अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकी दरम्यान सदरील समस्येवर चर्चा झाली तेव्हा, ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वॅब जमा करण्याच्या कामी स्वतंत्र मोबाईल व्हॅन तयार करावी असे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार ग्रामीण भागात मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी गावोगावी जाऊन संशयित व्यक्ती तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवू लागले आहेत.